दडपशाहीच्या काळातही अनेक पत्रकार व माध्यमे खंबीरपणे उभी असणे ही आश्वासक गोष्ट : अ‍ॅड. वर्षा देशपांडे

साप्ताहिक ‘कृष्णातीर’चा २५ वा वर्धापनदिन सोहळा वाईत उत्साहात संपन्न; रवींद्र बेडकीहाळ, उषा ढवण यांच्यासह मान्यवर पुरस्काराने सन्मानित

। लोकजागर । वाई । २२ जून २०२६ ।

“सध्याच्या युगात पत्रकारितेसमोर प्रचंड मोठी आव्हाने उभी आहेत. सर्व शक्तीचा वापर करून सारा मीडियाच एका विशिष्ट विचारसरणीच्या पाठीशी उभा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, अशा दडपशाहीच्या वातावरणात देखील अनेक प्रामाणिक पत्रकार आणि माध्यमे खंबीरपणे उभी आहेत, ही फार मोठी आश्वासक गोष्ट आहे. माहितीचा महापूर आणि डिजिटल क्रांतीच्या या पर्वात प्रिंट मीडिया आजही सर्वसामान्य जनतेच्या बळावर खंबीरपणे टिकून आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी केले. गेली २५ वर्षे सातत्याने पत्रकारितेच्या क्षेत्रात आपल्या यशस्वी वाटचालीचा झेंडा फडकवत ठेवणाऱ्या ‘साप्ताहिक कृष्णातिर’चा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन सोहळा वाई येथील टिळक स्मारक संस्थेच्या रमेश गरवारे सभागृहात अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला, त्याप्रसंगी त्या मुख्य अतिथी म्हणून बोलत होत्या. पुढे बोलताना त्यांनी, काळ बिकट असला तरी माध्यमांनी नकारात्मक गोष्टींचा उदोउदो न करता परिस्थिती बदलण्यास पुढाकार घ्यावा, तसेच अन्यायग्रस्त महिला अबला न ठरता अन्याय करणारा व्यक्ती समाजात हीन ठरला पाहिजे, तरच अत्याचारांना पायबंद बसेल असे सांगत महिलांचा सन्मान प्रत्येकाच्या कृतीतून सहजपणे व्हायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा ‘कृष्णातिर पुरस्कारा’ने गौरव

या दिमाखदार सोहळ्यास व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तथा गिर्यारोहक श्रीपाद जाधव, ज्येष्ठ विचारवंत सतीश कुलकर्णी, तिरंगा एज्युकेशन सोसायटीचे सचिव जयवंत पवार, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर, टिळक स्मारक संस्थेचे कार्यवाह भद्रेश भाटे आणि वाई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन ननावरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल खालील मान्यवरांना ‘कृष्णातिर पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले:

  • श्री. रवींद्र बेडकीहाळ (ज्येष्ठ पत्रकार)
  • सौ. उषा ढवण (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या)
  • श्री. अरुण आदलिंगे (कृषीतज्ज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते)
  • श्री. विठ्ठल माने (ज्येष्ठ सूत्रसंचालक व पत्रकार – त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे दत्ता मर्ढेकर व विष्णू जगताप यांनी पुरस्कार स्वीकारला)
  • श्री. गौरव साळुंखे (युवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर)

वाईच्या वैचारिक व पुरोगामी परंपरेचा आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विचारांचा उल्लेख करत अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी एका छोट्या गावातून सुरू झालेली कृष्णातिरची २५ वर्षांची दमदार वाटचाल आणि संपादक कृष्णात घाडगे व त्यांच्या सहकाऱ्यांचे परिश्रम यांचे विशेष कौतुक केले.

पुरस्कारार्थींचे मनोगत आणि यशाची कृतज्ञता

पुरस्काराला उत्तर देताना ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ यांनी कृष्णातिरच्या सातत्य आणि दर्जाचे कौतुक केले, तर अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांना आपल्या कुटुंबातील ‘झाशीची राणी’ असे संबोधित केले. बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लागल्याचे सांगत त्यांनी या पुरस्कारामुळे पुढील कामाचे बळ मिळाल्याचे नमूद केले. सामाजिक कार्यकर्त्या उषा ढवण यांनी हा पुरस्कार कष्टकरी व वंचितांच्या संघटनेचा असल्याचे सांगितले, तर अरुण आदलिंगे आणि युवा गौरव साळुंखे यांनी या पुरस्कारामुळे भविष्यात अधिक ताकदीने समाजहितैषी काम करण्याची जबाबदारी वाढल्याची भावना व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संपादक कृष्णात घाडगे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी आणि सकारात्मक पत्रकारितेचा आग्रह धरण्यासाठी कृष्णातिरची स्थापना झाली. पंचवीस वर्षांच्या प्रवासात आर्थिक नुकसान सोसूनही एकही अंक खंडित पडू दिला नाही; कोणाशी मतभेद झाले असतील तरी मनभेद होऊ दिले नाहीत, या स्वच्छ व प्रामाणिक भावनेने काम केल्यामुळेच आज हा नावलौकिक मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रम प्रसंगी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून सोहळ्याची सुरुवात झाली. राहुल तांबोळी यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले, तर किरण घाडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सोहळ्याला अ‍ॅड. शैला जाधव, अ‍ॅड. प्रतापसिंह देशमुख, प्रवीण बाबर, डॉ. मनोहर ससाणे, नंदकुमार खामकर, रमेश खामकर, डॅडी वाघ, प्रशांत जाधवराव, राजूदादा केंडे, प्रकाश पवार, अशोक येवले, जयवंत पिसाळ, महेंद्रआबा जाधव, विलास साळुंखे, निलेश बाबर, संदीप माने, अरुण जायकर, प्रकाश पानवळ, उद्धव कर्णे, बाळासाहेब जमदाडे, देवकुमार यादव, अशोक निंबाळकर, रामदास जाधव आणि घाडगे परिवारासह वाई परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love